
डेअरी किंवा दुकानातून दुध घेताय मग ही बातमी वाचाच
दुध संघाच्या त्या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका, खिशाला लागणार कात्री
पुणे – महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. कारण महाराष्ट्रात आजपासून दुधाच्या दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दुध घेताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांत वस्तूंच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे घर खर्च भागविताना चांगलेच नाकीनऊ येत आहेत. आता यात भर म्हणून दुधाचे दर दोन रुपयांनी वाढविण्यात येत आहेत. सध्या गायीच्या १ लीटर दुधाच्या पिशवीसाठी ५६ रुपये मोजावे लागत आहेत. आता त्यात आणखी वाढ झाली आहे. म्हशीचे दुध देखील महागले आहे. दूध उत्पादक आणि डेअरी कल्याणकारी संघटनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (कात्रज डेअरी) च्या पुणे जिल्ह्यात दरवाढीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. विविध सहकारी आणि खाजगी दुग्ध संघटनांच्या ४७ प्रतिनिधींनी या निर्णयाला एकमताने मान्यता दिली. यामुळे ही वाढ झाली आहे. गाईच्या दुधासाठी आजवर ५४-५६ रुपये मोजावे लागत होते. ते आता ५६-५८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हैशीच्या दुधासाठी आजवर ७०-७२ रुपये मोजावे लागत होते. ते आता ७२ ते ७४ रुपये होणार आहेत. दरम्यान उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईसस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे.