
‘काम सुरु ठेवायचे असेल तर २ कोटी दे, अन्यथा हातपाय तोडू’
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, धमकीचे काॅल रेकाॅर्डिंग सीआयडी पोलीसांच्या हाती, मोठा नेते रडारवर?
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलूमशाही, दडपशाही, खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. इतकेच नाही तर किती माणसं गायब झाली, किती खून झाले त्याची पाळंमुळं खोदून काढण्यात येत आहेत. आता एक फोन कॉलने मोठा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे.
आवादा कंपणीच्या खंडणी प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मस्साजोगमधील अधिकाऱ्याला खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरुन वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड याचे संभाषण झाले होते. हे धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र मिळून अधिकाऱ्यांना धमकावले आहे. काम सुरु ठेवायचे असेल तर २ कोटी रुपये द्या, अन्यथा हातपाय तोडू… असा कॉल विष्णू चाटेच्या फोनवरुन करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हा आवाज विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचा आहे का? याबाबतचा तपास सीआयडी करत आहे. या खंडणी प्रकरणात विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने याआधीच घेतले आहेत तसेच या धमकी प्रकरणी आरोपी वाल्मीक कराड याचे व्हाइस सॅम्पल तपासले जाणार आहेत. दरम्यान सुनील केदू शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वाल्मीक कराड याने २९ नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता.
वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत आहे. पण, कराड हा तणावात असून त्याला व्यवस्थित झोपही येत नाही. त्यामुळे त्याचे डोळे लाल झाले आहेत. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे. त्यानंतर नेत्ररोगतज्ञांनी तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यात आले.