
जिथे गुंडाची काढली मिरवणूक तिथेच पोलीसांनी काढली धिंड
जेलमधून बाहेर आल्यावर मिरवणूक काढलेल्या कसबेची पोलीसांनी काढली धिंड, व्हिडिओ व्हायरल
पुणे – पुण्यात सध्या गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. तसेच एका मोक्कातील आरोपीची धिंड काढण्याची घटना घडली होती. पण आता पोलीसांनी त्यांची धिंड काढली आहे.
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. मात्र, त्याने बाहेर येताच आपल्या दहशतीचा पॅटर्न कायम ठेवत साथीदार यांच्यासह परिसरात रॅली काढली होती. रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल ३५ ते ४० साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे, दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी त्या भागातील आहेत म्हणून त्याच भागात त्यांची धिंड काढली. पण त्याच्या आधी कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी पकडून बंद पडद्याआड भरचौकात चोप दिला. त्यानंतर त्यांची धिंड काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
सराईत गुन्हेगार असलेल्या गुड्या कसबे याच्यावर संघटित गुन्हेगारीचं कलम असलेल्या मोक्का लावण्यात आला होता. कालच तो येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याची स्थानिक गुंडांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती. याचवेळी या गुंडांनी स्थानिकांना धमकावलं देखील होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांनी याच्या बातम्या केल्यानंतर पोलीस जागे झाले होते.