
पुण्याच्या ग्रामीण भागात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करुन गर्भातच मुलींची कळी खुडण्याचा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. बारामती मधील माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सोनोग्राफी करण्याचा गोरख धंदा उघडकीस आला आहे.याप्रकरणी डॉक्टरसह एका एजंटला माळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (दि.7) केली असून आरोपींकडून सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे. याबाबत बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
गर्भलिंग निदान करणारा डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय 52, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय 37, रा. ढेकळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. विशेष म्हणजे डॉ. शिंदेला यापूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यात अनेक वेळा अटक करण्यात आली आहे.पुण्याच्या ग्रामीण भागात चारचाकी गाडीमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांना मिळाली होती. त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. यमपल्ले यांनी शिक्रापूर, यवत, दौड, इंदापूर, बारामती येथील वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगताप यांनी माळेगाव पोलिसांना डॉ. मधुकर शिंदे याच्याबाबत माहिती दिली.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डॉ. शिंदे याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी एजंट बाळासाहेब घुले याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यानुसार बारामती पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी त्या दोघांना गोफणेवस्ती येथे सोनोग्राफी मशीनसह ताब्यात घेतले. त्यांच्यावर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियम नुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भांगे करत आहेत.यामध्ये अटक करण्यात आलेला डॉ. मधुकर शिंदे अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे. त्याच्यावर यापूर्वी दौंडमध्ये आणि सातारा येथे गुन्हे दाखल आहेत. डॉ. शिंदे एजंट घुलेच्या मार्फत गर्भलिंग निदान करणाऱ्या महिलांची पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे सोनोग्राफी करून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळत असल्याचे तपासात समोर आले आहे.