
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे.
सकाळपासून सेलिब्रिटी, नेते मंडळी तसेच राज्यातील नागरिकांनीही मतदानासाठी रांगा लावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मात्र याचदरम्यान मुंबईतील भांडूप येथे गोंधळ माजल्याचे दिसून आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत होते. मात्र त्याला आक्षेप दर्शवत पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि गदारोळ माजला. तेथील वातावरण तापले.यामुळे संजय राऊत भलतेच आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. आज सकाळी संजय राऊत मतदानासाठी बाहेर पडले, पण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पाहून ते संतापले आणि पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे वातावरण तापले होते.
मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे डमी मशीनचं प्रात्यक्षिक दाखवत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडीत बसवले. हे लक्षात येताच राऊत यांनी पोलिसांना या कारवाईबाबात प्रश्न विचारले. आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून 100 मीटर बाहेर अंतरावर होते, टेबलवर नागरिकांना मार्गदर्शन करत होते, मग त्यांना ताब्यात का घेतले असा सवाल राऊत यांनी पोलिसांना विचारला. ही दडपशाही असल्याचा आरोपही राऊत बंधूंनी केला. मात्र आम्ही या दबावाला बळी पडणार नाही , असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.