
पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये कपडे फाटेपर्यंत तुफान हाणामारी
एमआयटी काॅलेजसमोर दोन टोळक्यांमध्ये हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, भीतीचे वातावरण
पुणे – लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ही घटना एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या ईस्ट हेवन सोसायटीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी एमआयटी काॅलेज असल्याने अनेक विद्यार्थी राहत आहेत, काही काॅलेजच्या हाॅस्टेलला तर काही रुम करुन राहत आहेत. त्यामुळे अनेकदा मुलांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वाद होत असतात. आजही असाच वाद झाला. यावेळी एका ग्रुपने तिघांना बेदम मारहाण केली आहे. तर दोन विद्यार्थी पळून जाण्यास यशस्वी ठरल्याने बचावले आहेत. या मारहाणीत क्रेयॉन्स प्री स्कूल मध्ये पाल्याला नेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आजोबाच्या पोटात दगड लागला आहे. तर शाळेच्या शिक्षकांनी समयसूचकता दाखविल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतले आणि गेट बंद केल्यामुळे सुदैवाने या मारहाणीत लहान विद्यार्थी बचावले आहेत. पण या घटनेमुळे घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच या घटना वाढत असल्याने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालक करत आहेत. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि समज देऊन सोडल्याची माहिती आहे. जर या विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद झाला असता तर त्यांच्या करिअरवर परिणाम झाला असता. त्यामुळे पोलिसांनी केवळ समज देऊन त्यांना सोडून दिले.
या परिसरात वादाच्या घटना नेहमीच होत असल्याची माहिती आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मारामारीच्या या घटनांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.