पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणाचा तरुणीवर कोयत्याने हल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, तरुणामुळे वाचला तरूणीचा जीव, एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा थरार
पुणे दि २७(प्रतिनिधी)- देशातील महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. दिल्लीतील तरूणीचे एकतर्फी प्रेमातून तब्बल ४० वार खून केल्याची घटना घडली होती तर पुण्यातही लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात आली होती. पण तरीही या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आज पुण्यातही एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला दोन तरूणांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली आहे.आज सकाळी दहा वाजता एक तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. ति त्याला बोलत असताना तिथे शंतनू जाधव हा तरुण आला आणि त्याने आपल्या बॅगमधुन कोयता काढत तरुण-तरुणीवर वार करायला सुरुवात केली. यावेळी तरूणाने तिथून पळ काढला. मग शंतनूने तरूणीचा पाठलाग सुरु केला. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला.त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान लेशपाल जवळगे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. आज जर तो मुलगा नसता तर माझी मुलगी वाचली नसती, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली. या हल्ल्याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.
जाधव अनेक दिवसापासून पीडित मुलीला त्रास देत होता.आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची कल्पना देण्यात आली होती. मात्र एवढं होऊन देखील आरोपीने मुलीला फोन करून धमकी देत होता. दरम्यान, पुण्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर जीव वाचवणाऱ्या तरुणाचे काैतुक करण्यात येत आहे.