पुण्यातील या भागात सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने खून
पुण्यात खुनाचे सत्र थांबेना, भररस्त्यात केला तरूणाचा खुन, पुणे पोलीसांसमोर मोठे आव्हान, आरोपी पसार
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात खून, दरोडेखोरी, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. घोरपेडे पेठ येथे एका तरुणाची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता वडगाव शेरी येथे बुधवारी रात्री एका तरुणाचा सात आठ जणांनी मिळून खून केला आहे. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.
अभिषेक दत्तू राठोड असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वडगावशेरी सैनिकवाडी येथे आठ ते दहा जणाच्या टोळक्याने तयाची हत्या केली आहे. खून झालेला तरुण हा देखील सराईत आरोपी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक हा चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, तसेच लुटमारीच्या घटना दाखल आहे. राठोड हा सैनिकवाडी येथे आला असता दबा धरून बसलेले सात ते आठ जणांनी त्याच्यावर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राठोड याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत कळू शकले नाही. मात्र, पोलिसांनी प्राथमिक चौकशीत साई उर्फ दादा पाटोळे व इतर पाच अशांची नावे निष्पन्न केली आहेत. त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथके तयार करण्यात आली असून, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मयत राठोड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही, पण पूर्ववैमनस्यातून राठोड याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अभिषेकचे वडिल दत्तू राठोड यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढल्याने पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.