जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावावर किंवा लहान भावाकडून मोठ्या भावावर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात . मात्र, औंध येथे कॉटवर झोपण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावावर कांदा कापण्याच्या चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.7) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपी मोठ्या भावावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
या घटनेत लहान भाऊ अक्षय दिलीप कांबळे (वय-25 रा. गायकवाड वसाहत, डी.पी. रोड, औंध) हा जखमी झाला असून त्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमर दिलीप कांबळे (वय-29 रा. डी.पी. रोड, औंध) याच्यावर आयपीसी 326, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांचे सख्खे भाऊ असून एकाच घरात राहतात.शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघेही घरात होते. जखमी अक्षय हा कॉटवर झोपला होता.तर आरोपी अमर खाली जमिनीवर झोपला होता. अक्षय मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी गेला असता आरोपी कॉटवर झोपला.अक्षयने अमर याला कॉटवरून उठण्यास सांगितले. याचा राग आल्याने अमर याने त्याला शिवीगाळ केली. यातून दोघांमध्ये वाद झाला. अमर याने रागाच्या भरात घरातील कांदा कापण्याच्या चाकूने अक्षय याच्या छातीवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. अक्षयने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अमर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.