
अमानुष! तू मला आवडत नाहीस म्हणत पतीची पत्नीला बेदम मारहाण
नवविवाहीतेला पतीने दिले गरम चाकूने चटके, तोंडात खुपसला चाकू, म्हणाला ‘तू मला आवडत नाहीस, मग जवळ का...?
खरगोन – मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सुंदर दिसत नाही, या कारणामुळे पतीने पत्नीला गरम चाकुचे चटके देत मारहाण केली आहे. या अत्याचाराला कंटाळून पीडितेने तक्रार दाखल केली आहे.
खुशबू असे विवाहितेचे नाव आहे. पीडितेच्या शरीरावर ५० हून अधिक चटक्यांचे व्रण आढळून आले आहेत. खुशबू हिचा विवाह २ फेब्रुवारी रोजी बडवानी जिल्ह्यातील अंजड येथील भंगार व्यावसायिक दिलीप पिपलिया याच्याशी झाला होता. लग्नापासूनच तिच्या पतीला, दिलीपला ती आवडत नव्हती आणि तो नेहमीच हुंड्यासाठी तिला मारहाण आणि छळ करत असे, असा आरोप तिने केला आहे. खुशबूने सांगितले की, रविवारी रात्री तिचा पती दिलीप मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने गॅसवर चाकू गरम केला. त्यानंतर त्याने तिला हात, पाय, पाठ आणि ओठांवर अनेक ठिकाणी चटके दिले. त्यानतंर त्याने माझे हातपाय बांधून टाकले. आणि मी बचावासाठी आरडाओरडा केला तेव्हा त्याने तोच चाकू माझ्या तोंडातही खुपसला, असा आरोप तिने केला आहे. तू मला आवडत नाही, तुला जवळ येऊ नको सांगितलं होत ना, मना केलं होतं ना, मग तू का आलीस ? असं तो सतत म्हणत होता. माझ्या आईवडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न लावले होते, असाही आरोप खुशबूने केला आहे. सासरच्या मंडळींनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. उलट खुशबूने स्वतःच स्वतःला चटके दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.
याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी खुशबूला जिल्हा रुग्णालयात दाखल केले जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.