Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरुरमध्ये रेल्वे आहे का? मग रेल्वेला वायफाय कोण पुरवतं हा प्रश्न कोणासाठी; कोल्हेंनी आढळरावांना घेरलं

महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेतल्या कामकाजाची पोलखोल करत आणखी पुरावे सादर केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुरमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा येथील पाच कंदील चौकात झाली.या सभेला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजता पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर उपस्थित होते.

ओतूरच्या सभेत अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संरक्षण खात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची पोलखोल केली होती. त्यावर आढळराव पाटलांनी पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांनी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर करत आहेत.आढळराव पाटलांच्या चिरंजीवाने हे आरोप फेटाळून लावत एक व्हिडिओ समाज माध्यमात प्रचारित केला. त्याचाच आधार घेत अमोल कोल्हे यांनी रेल्वे संबंधी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे जाहीर सभेत सादर केले. ते म्हणाल की, याच भागात येऊन रामलिंग महाराजांची खोटी शपथ कोणी घेईल असं वाटलं नव्हतं. माझा काहीही संबंध नाही असं सांगता आणि दुसरीकडे पोराला व्हिडीओ कशाला करायला लावला, असा सवाल त्यांनी केला. मायबाप मतदारांनी निवडून दिल्यावर कंपनीचे साटेलोटे करता त्याचं उत्तर द्या, असं आव्हान अमोल कोल्हेंनी दिले.

29 जुलै 2010 ला प्रश्न विचारला आहे, रेल्वेत इंटरनेट सुविधा कधी सुरू होणार याची माहिती द्या, आता शिरुर मध्ये रेल्वे आहे का हो? असा सवाल करत मी डिफेन्सचा टॅब सांगितला तर कशी उरुळी कांचन मध्ये पाणबुडी गडगडली असा टोला कोल्हे यांनी लगावला. लोकप्रतिनिधीचा बुरखा घालून जे व्यापार करतात, अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांनी उत्तर द्यावे, असं जाहीर आव्हान ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिले.मराठा क्रांती मोर्चाचे नेते अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी अमोल कोल्हे यांना जाहीर पाठींबा दिला. वाडेकर म्हणाले की, भाजपने मराठा समाजाची फसवणूक केली. त्या भाजपला जागा दाखवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, माझ्या उमेदवारीचा कोणाला फायदा होऊ नये, म्हणून बिनाशर्त पाठिंबा देत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!