बीड दि १६ (प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला होता. पण आता एका कार्यकर्त्याने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी हा दावा केला आहे.
मायकर म्हणाले की, ३ ऑगस्टला विनायक मेटेंच्या कारचा बीड ते पुणे प्रवासादरम्यान दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, त्यात एक अर्टिगा कार होती आणि दुसरी आयशर होती. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला”, अशी माहिती अण्णासाहेब वायकर यांनी दिली आहे. स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची मायकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही ‘मीदेखील नुकतीच ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे. मायकर यांच्याशी माझं बोलणं झाल आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे’ अशी मागणी केली आहे. मेटे यांच्या आईनेही आपल्या मुलाला मारायच नव्हत अस विधान केल होत.