आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल
मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा, शेतकरी आनंदला, कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली. आता आगामी आठवड्यात संपुर्ण महाराष्ट्रात मेघर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह राज्यातील शेतकरीही चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. मान्सूच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. केरळात ८ जून रोजी मान्सून धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तरीही जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये काल पासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून ७ जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा उशीर झाला आहे. मान्सूनने महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यासाठी ११ जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत संपूर्ण राज्यात सक्रीय होईल. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी तो सक्रीय कधी होणार याबाबत लवकरच हवामान विभाग माहिती देणार आहे. मान्सून येत्या ३ ते ४ दिवसात संपूर्ण राज्यात सक्रिय होईल. अंदाजे १६ जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीदेखील आनंदी झाला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून अधिक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत अधिक तीव्र होणार आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीला जाणवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बिपरजाॅय वादळाचा गुजरात आणि कोकण किनारपट्टीला परिणाम जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.