
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिला आहे.दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे. शेखर पाचुंदकर यांच्यासह देवदत्त निकम आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शेखर पाचुंदकर हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधील आंबेगाव तालूक्यातील 42 गावांचे प्रमुख आहेत.
शेखर पाचुंदकर आणि देवदत्त निकम यांनी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत वाढली आहे. शेखर पाचुंदकर हे आता शरद पवार गटाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहेत. शेखर पाचुंदकर यांना आंबेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतून नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीनं या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील असा सामना रंगणात आहे.