त्या डाॅक्टर महिलेचा अपघात नाही तर खून झाला, मोठी खळबळ
विवाहित डॉक्टरचा अपघातात पंधरा दिवसांनी मोठा ट्विस्ट, परिसरात खळबळ, डाॅ. भाग्यश्री सोबत नक्की काय घडले?
नाशिक दि १२(प्रतिनिधी)- नाशिक जिल्हयातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात एका डाॅक्टर महिलेचा अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलीसांनीही अकस्मात मृत्यूची तक्रार दाखल केली होती. पण आता या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसही नव्या खुलाशामुळे अँक्शन मोडवर आले आहेत.
डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे असे मृत महिलेचे नाव आहे. पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व सासरे नंदू शेवाळे यांनी भाग्यश्रीचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून झाल्याचा आरोप करत तिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. पण तब्बल १५ दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन साळुंखे याने नांदगाव पोलीस ठाण्यात बहीण भाग्यश्री हिचा खून झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. भाग्यश्रीकडे तिचा पती आणि सासरे ‘तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये’ अशी मागणी करत होते. पण ती मागणी मान्य न झाल्यामुळे त्यांनी भाग्यश्रीचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून केल्याचा आरोप भावाने केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत असून पोलीस तपासात काय समोर येते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड, यांच्या मागदर्शनाखाली नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर अधिक तपास करीत आहेत.