जळगाव हादरले..! निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार; परिसरात खळबळ, नेमके प्रकरण काय?
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच जळगावातील मेहरुण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या.
अहमद हुसेन शेख यांचे मेहरुण परिसरातील शेरा चौकात घर आहे. मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी खूप गर्दी जमली. याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आले आहेत.
अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. आठ दिवसापूर्वीच मुक्ताईनगर येथील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर देखील अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोवर, शहरातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर पहाटे चार वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या घरातील खिडकीचे काच फुटलेले आहेत. तसेच जिवंत काडतुसे देखील त्या ठिकाणी पडलेले असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे.
.