
जम्मू काश्मीरचे मा. राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
मोदींवर केलेली उघडपणे टिका, मलिक यांची अखेरची भावनिक पोस्ट व्हायरल, मी असेन नसेन पण सत्य....
दिल्ली – जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज ५ ऑगस्ट रोजी आरएमएल रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे ते सर्वात जास्त चर्चेत आले होते.
सत्यपाल मलिक यांच्या स्वतःच्या ट्वीटर हॅन्डल वरूनच त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. माजी राज्यपाल चौधरी सत्यपाल सिंह मलिक यांचे निधन, असे ट्वीट आज दुपारी करण्यात आले. यानंतर संपूर्ण देशात मलिक यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मूत्रमार्गाच्या गंभीर संसर्गामुळे मे महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तरीही मृत्यूशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी ७ जून रोजी त्यांनी आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यांनी त्यावेळी ट्विट करत म्हंटल होते, नमस्कार मित्रांनो, मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. मी काल सकाळपासून ठीक होतो पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो किंवा नाही जगलो तरी माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो, मी राज्यपालपदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि ते माझा विश्वास कधीही डळमळीत करू शकले नाहीत. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली होती. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि १९८० ते १९८९ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते. राज्यापाल झाल्यापासून त्यांची कारकीर्द जास्त चर्चेत आली होती. ते काश्मिरचे राज्यपाल असतानाच कलम ३७० रद्द करण्यात आले होते.
https://x.com/SatyapalMalik6/status/1931269704787574993?s=19
जम्मू-काश्मीरमधून गोवा राजभवनात पाठवल्यानंतर सत्यपाल मलिक यांच्या वृत्तीत बदल दिसून आला आणि ते मोदी समर्थकांपासून त्यांचे सर्वात मोठे टीकाकार बनले होते. त्यांनी अनेकवेळा उघडपणे मोदी आणि शहांवर टिका केली होती. दरम्यान अनेकांनी मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.