पत्रकार विकास हाच ध्यास, लोणी काळभोरला शनिवारी कार्यशाळा व स्नेह मेळावा; पाचशे पत्रकार उपस्थित राहणार!
लोणी काळभोर – महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळावा शनिवारी (ता. २२) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुणे व सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशे पत्रकार उपस्थित रहाणार आहेत. ‘आपणच आपल्यासाठी’ आणि ‘पत्रकार विकास हाच आमचा ध्यास’ या भूमिकेतून ही मार्गदर्शक कार्यशाळा व स्नेह मेळावा होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी दिली.
मेळाव्याबाबत अधिक माहिती देताना सुनिल जगताप म्हणाले की, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठातील राजकपूर सभागृहात शनिवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे. पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दौंडचे आमदार राहुल कुल भूषविणार आहेत.
या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद आदी उपस्थित रहाणार आहेत. या वेळी ‘पत्रकार व त्यांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर ‘पत्रकारिता आणि न्यायिक बंधने’ या विषयावर असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकारांचा स्नेहमेळावा दुपारी २.३० वाजता होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आयबीएन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे, आमदार दत्ता भरणे, आमदार संजय जगताप, एमआयटी विद्यापीठाचे अध्यक्ष मंगेश कराड उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार अशोक पवार भूषविणार आहेत.
‘पुणे प्राईम न्यूज’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन पत्रकार विलास बडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी मंगेश चिवटे यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना असामान्य कर्तृत्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याला सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुनील जगताप यांनी केले. या वेळी कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते.