Latest Marathi News
Ganesh J GIF

भीषण! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली

माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती, महाराष्ट्र हादरला, पाच जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

रायगड दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विशेषतः कोकणात जोरदार अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या अतिवृष्टीने एक भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालाापूर तालुक्यातील इरसालवाडी या गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळली आहे. या गावात ५० घर होती यात साधारण २०० लोक राहत होते. मुख्य रस्त्यापासून दोन तास अंतरावर दुर्गम भागात हे गाव आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून २२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. आताही बरेचजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. घटनास्थळी बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. पावसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच घटनास्थळी मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहे. मात्र वातावरणाच्या स्थितीमुळे ते स्टँडबायवर आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांचा खर्च आणि जखमींचा सर्व खर्च सरकारतर्फे कडून करण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मध्यरात्री मोठा आवाज आला त्यावेळेस गावावर डोंगर कोसळल्याचे गावातील तरूणांनी सांगितले. विशेष म्हणजे हे गाव दरडप्रवण यादीत नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे यांनी याबाबत चाैकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे माळीण गावात दरड कोसळल्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. नऊ वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेतमध्ये माळीणमधील १५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील ७४ पैकी ४४ घरे दबली गेली होती. संपूर्ण माळीण गाव क्षणार्धात गायब झाले होते. दरम्यान इर्शाळवाडीदेखील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!