खुनशीने पाहिल्याने टोळक्याने पार्क केलेल्या वाहनांच्या फोडल्या काचा ; तब्ब्ल ९ वाहनांवर दगडफेक करत पसरवली दहशत, एकाला अटक
खुनशीने का पहात आहे, असे म्हणून एका टोळक्याने काळेपडळ येथे पार्क केलेल्या रिक्षा,कार, टेम्पो अशा ९ वाहनांवर दगडफेक करुन दहशत माजविली. हा प्रकार काळेपडळ येथील म्हसोबा मंदिराजवळील स्वराज पार्क येथे सोमवारी पहाटे पावणे दोन वाजता घडला.
याबाबत अभिषेक उद्धव झगडे (वय २४) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहील कांबळे व त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पहाटे आपल्या सोसायटीत उभे असताना साहिल कांबळे हा त्यांच्याकडे खुनशीने पहात होता. त्याचा राग मनात धरुन कांबळे व त्याच्या चार साथीदारांनी ५ रिक्षा, २ कार व २ टेम्पो अशा ९ वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून नुकसान केले. सहायक फौजदार साबळे तपास करीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी अक्षय संतोष राख (वय १९) याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले आहे. पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.