Latest Marathi News
Ganesh J GIF

अपहरण करुन एक कोटीची मागणी, सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

शेअर मार्केटमधून जास्त फायदा करुन देण्याचे आमिष दाखवून  पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमधून अपहरण केले.त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांवर अपहरण , खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विश्वास भानुदास शितोळे (वय 34, रा. प्लॅट नं. 2204, आय विंग, पुणे व्हिले सोसायटी, फेज 2, पुणावळे. पिंपरी चिंचवड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अमित रोकडे, दयानंद रोकडे (दोघेही रा. अहमदपूर, लातूर), अमोल क्षिरसागर (रा. पर्वती पुणे) व चार अनोळखी इसमांवर आयपीसी 365, 385, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला असून शितोळे यांनी मंगळवारी (दि.28) फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे हे नोकरी करतात. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले.

आरोपींवर विश्वास ठेवून फिर्य़ादी यांनी काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. आरोपींनी सुरुवातीला परतावा मिळवून दिला. त्यानंतर फिर्य़ादी व त्यांचे नातेवाईक मित्र यांच्याकडून सहा कोटी रुपये जमा करुन आरोपींना दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे शितोळे यांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला होता. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करुन शितोळे यांचे कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्ट येथे बोलावून घेतले. शितोळे त्या ठिकाणी आले असता महिंद्रा कंपनीच्या एक्सयु 700 गाडीतील अनोळखी चार जणांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले.त्यानंतर शितोळे यांना पुणे-सोलापूर महामार्गावरुन सोलापूरच्या दिशेने नेले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, शितोळे यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर अनोळखी चार जणांनी त्यांना सोडून दिले. शितोळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!