लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जुलै महिन्यात राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार आहे.या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य १० उमेदवारांची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उमेदवारांच्या नावांचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बोललं जात होतं. याबाबत आता स्वत: बावनकुळे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत २० हून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. ते पत्र नाहीच; ते एक फक्त पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. निवडणुकीसाठी काही लोकं अंदाज बांधतात, त्यातून याद्या तयार होतात,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
“विधानपरिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी महायुतीतील ११ घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय करू,” अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.कोणत्या नावांची यादी झाली होती व्हायरल?
१. पंकजा मुंडे
२. अमित गोरखे
३. परिणय फुके
४. सुधाकर कोहळे
५. योगेश टिळेकर
६. निलय नाईक
७. हर्षवर्धन पाटील
८. रावसाहेब दानवे
९. चित्रा वाघ
१०. माधवी नाईक