
भाजपाच्या दोन नेत्यांमुळे टळला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा
अजित पवार यांनी ती अट ठेवताच फडणवीस बॅकफुटवर, राजीनामाच्या दबाव सोडला, शिंदेही आक्रमक, नेमके काय घडले?
मुंबई – अधिवेशनकाळात विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा आरोप असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार अशी चर्चा होत होती. पण अजित पवार यांच्या दोन अटीमुळे कोकाटे यांना अभय मिळाले असून भाजपा आणि शिंदे गटाला नाईलाजाने माघार घ्यावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती, त्यामुळे कोकाटे यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी अटळ मानली जात होती. कारण सतत वादग्रस्त वक्तव्य आणि रमीमुळे ते वादात सापडले होते. अजित पवार यांनी त्यांना बोलावून देखील घेतले होते. पण एका गोष्टीमुळे कोकाटे यांना अभय मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस देखील कोकाटे यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याकडे कोकाटे यांचा विषय काढताच अजित पवार यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम, आणि भरत गोगावले यांच्यावरील आरोपांचा उल्लेख केला. एवढेच नाहीतर हनीट्रॅप वादात अडकलेले गिरिश महाजन आणि विधीमंडळ आवारात मारहाण करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई केली तरच आपण कोकाटे यांचा राजीनामा घेऊ अशी अट घातली. एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांचा मुद्दा लावून धरत पडळकर आणि महाजन यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आक्रमक असणाऱ्या फडणवीस यांना अखेर माघार घ्यावी लागली. दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना समज देत पुढची चूक माफ केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. पण गिरिश महाजन आणि पडळकर यांच्या नावाचा वापर करत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांचा मात्र बचाव केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सर्व मंत्र्यांना समज दिली. वादग्रस्त विधानं करु नका, वर्तन चांगलं ठेवा, अशी समज त्यांना देण्यात आली. पण फडणवीस यांनी वादग्रस्त नेत्यांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.