मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा अल्टिमेटम आज संपत आहे. 13 जुलै रोजीपर्यंत सरकारने यावर निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला होता.त्याची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. आज मराठवाड्यातील त्यांच्या महाशांतता रॅलीची छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता झाली. त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. या रॅलीला मराठवड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विधानसभेचे गणित काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जालन्यामध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यांना हात घातला. आमच्या व्हॅलीडिटी करून घ्या ,मुद्दामहून ते टाळलं जातंय,काही अधिकारी जाणून बुजून हे देणं टाळतायत मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे. कुणीही विरोध केला तरी सगे सोयरे अंमलबजावणी घेणार, आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या, यावर त्यांनी जोर दिला.सरकारला सत्तेवर मराठ्यांनीच बसवलं आहे.आता विधान परिषदेत जे निवडून आलेत त्यांना मराठ्यांच्या आमदारांनीच मतदान केलं आहे आमच्यावर अन्याय झाला आहे की या आमदारांना पुन्हा लोक निवडून देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आम्ही जातीयवादी नाही जातीयवादी कोण आहे हे आरोप करणाऱ्यांनी मागे वळून पाहावं. विरोधकांनी बैठकीला जायचं होतं. ते आले नाहीं, म्हणून तुम्ही न देणं योग्य नाही. तुम्ही सरकार आहात. तुम्ही आरक्षण द्यायलाच हवं. तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का, तुम्हाला लाज वाटत नाही का? रस्त्यावर लोक उतरतायात हे तुम्हाला दिसत नाही का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. सगळ्या जनतेला समान न्याय द्या. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. आरक्षण ही आमची खदखद आहे.
आम्ही सगळे उमेदवार संपवून टाकू. मी सरकारला सावध करतोय, आम्ही तुमचे 288 उमेदवार पाडू.सरकारशी काहीही बोलणं झालेले नाही. आज पूर्ण दिवस त्यांना दिला आहे. आजचा दिवस वाट बघू. सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय का ते बघू, आमचे अजूनही काही टप्पे बाकी आहे, आजच्या पूर्ण दिवसाची वाट बघू. आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत लवकरच तो जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.यांनी नागपूर करार करून घेतला पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही हे विश्वास घात करणारे निघतील असं तेव्हाच वाटलं असतं तर मराठ्यांनी तेव्हाच आरक्षण घेतलं असतं. प्रकाश आंबेडकर यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे पण आमचाही आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.