Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात विवाहित जोडप्याला टोळक्याची बेदम मारहाण

दगड मारले, गाडीच्या काचा फोडल्या, महिलेलाही बेदम मारहाण, टोळक्याच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे – पुण्यातील पाषाण सर्कलजवळ १८ एप्रिलच्या रात्री एका विवाहित जोडप्यावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर घरी परतत असताना झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केतकी भुजबळ आणि त्यांचे पती अमलदेव पी. व्ही. के. रमण यांच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यात अमलदेव गंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर केतकी भुजबळ यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतकी भुजबळ आणि तिचे पती अमलदेव पीव्हीके रमन रात्रीच्या सुमारास मुकुंद नगरहून परत येत असताना त्यांच्या चाकचाकीची मद्यधूंद स्कूटर चालकाकडून वारंवार अडवून व्हायची. त्यामुळे अमलदेव यांनी त्यांना बाजूला करण्यासाठी अनेकदा हॉर्न वाजवले. यामुळे चिडलेल्या तरूणाने गाडी आडवत जोडप्याला मारहाण करत गाडीचीही तोडफोड केली आहे. केतकी यांनी इन्स्टाग्रामवर या घटनेचा अनुभव शेअर करताना सांगितले, “त्यांनी आमच्या गाडीला सुमारे २० मीटरपर्यंत अडवले. आम्ही गाडी थांबवून काय समस्या आहे, हे विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो व्यक्ती अत्यंत आक्रमक झाला आणि अमलदेववर हल्ला करू लागला.” यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. “अचानक आणखी चार जण तिथे आले. दोघांनी अमलदेवला पकडले, तर इतरांनी त्याच्यावर दगड आणि काठ्यांनी हल्ला केला, मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकाने माझ्या पोटात लाथ मारली आणि चेहऱ्यावर ठोसा मारला,” असे केतकी यांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, दुर्दैव म्हणजे अनेकांनी हा प्रकार पाहूनही मदतीसाठी पुढे येण्याचे टाळले. “सगळे फक्त पाहत राहिले, कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यापेक्षा मोठं दु:ख काहीच नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया केतकी भुजबळ यांनी दिली आहे.

या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ११८(१), १२६(२), ११५(२), ३५२, ३२४(४), ३(५) आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. जी. भिसे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!