रत्नागिरी दि १०(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तसेच अनेक तर्कवितर्क काढले जात आहे.
संजय सदा निकम आणि सोनाली संजय निकम असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. सोमवारी दुपारी दोघेही मजुरीचे काम करू त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी रोजच्या प्रमाणे जेवण करण्यास घेतले. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या जेवणात विष टाकले. या दोघांनी जेवणासहित विष घेऊन झोपी गेले. सायंकाळी बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण घटनेबाबत मृत पती-पत्नीच्या आजी यांनी रात्री उशिरा शिरगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्यासाठी धाव घेतली आहे. हे दोघेही पती-पत्नी शेतावरून काम करून आले त्यानंतर दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला असावा असे सांगितले जात आहे.जोडप्याच्या मृत्यूने आजीला मोठा धक्का बसून, गावात शोककळा पसरली आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी चाैकशी केली आहे. पण संजय आणि सोनाली या जोडप्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आर्थिक संकटाला कंटाळून जोडप्याने पाऊल उचललं का, की काही इतर काही कारण आहे, हे समोर आलं नाही. याचा तपास पोलीस करत आहेत.