पुण्यात कोयता गँगची दहशत कायम मोबाईल मार्केटची तोडफोड
कोयता गँगमुळे पुणे पोलिसांच्या नाकी नऊ, तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल
पुणे दि १०(प्रतिनिधी) – पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांना आव्हान दिले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून त्यांचा दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचे नाव घेत नाही. आता पुण्याच्या मोबाईल मार्केट येथील तापकीर गल्लीत हातात कोयता घेऊन टोळक्याने दहशत माजवली. यामुळे स्थानिक दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वसंत टॉकीज समोरील तपकीर गल्ली ही मोबाईल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. या गल्लीत सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यावेळी हातात कोयते, बांबू घेतलेले तोडाला रुमाल बांधलेले चौघे जण गल्लीत आले. ते एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेले. परंतु, गर्दीमध्ये कोणाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करीत तेथील मोबाईल दुकानावर हातातील कोयते, बांबुने सपासप वार करुन तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेव्हा दुकानदारांनी पटापट दुकानांची शटर ओढून घेतली. त्यानंतर त्या टोळक्याने तुळशीबागेत हैदोस घातला.तेथील दोघा व्यावसायिकांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यातील एकाला कावरे कोल्डिंगजवळ पकडले. काही वेळातच पोलीस आल्यावर त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. पकडलेले दोघेही अल्पवयीन असून पाटील इस्टेट येथे राहणारे आहेत. भाईगिरी करण्यासाठी दहशत पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
फरासखाना पोलिसांनी मोबाईल मार्केटमध्ये धाव घेत या ठिकाणी पडलेला एक कोयता ताब्यात घेतला आहे. गुंड कोण होते? याचा पुर्ण तपास अजून लागलेला नाही. दोन पकलेल्या आरोपींकडुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे स्थानिक दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.