पुणे : वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
पच्चीस शेख याच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गुलाम दौस खान असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.