पुणे दि ११ (प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. पण या सरकारमधील शिंदे गटाच्या एका मंत्र्यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनियुक्त मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या शिंदे गटातील ९ आमदारांपैकी तानाजी सावंत एक आहेत. खातेवाटपाच्या बैठकीआधी ते पुणे दौऱ्यावर होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तानाजी सावंत आजच्या खाते वाटपासंदर्भातील बैठकीला गैरहजर राहणार आहेत. बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर लगेच मंत्री आजारी पडू लागल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे.
विस्तारानंतर दोन दिवस उलटून गेले तरी खाते वाटप झाले नाही.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यात प्रत्येक मंत्र्याला दोन ते तीन खात्यांचा पर्याय विचारण्यात आला आहे. त्यामुळे खाते वाटपाचे चित्र रात्री स्पष्ट होणार आहे.