
मंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘या’ मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा
महायुतीत अजित पवार गटाला दुसरा झटका, पवार गटात खळबळ, या नेत्यावर जबाबदारी?
मुंबई – धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटात काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर आता अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवार गटात आता एकच खळबळ उडाली आहे. मुश्रीफ हे मुळचे कोल्हापुरचे असल्याने आपल्या मतदारसंघाला वेळ देता येत नाही, म्हणून जबाबदारी सोडल्याचे कारण सांगण्यात येत आहे. परंतु यामागे दुसरंही कारण असणार का ? याचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने ८०० किमीचा प्रवास करणं शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रिपद सोडल्याची माहिती सध्या दिली जात आहे. पण खरे तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी संधी न मिळाल्याने ते नाराज होते. विशेष म्हणजे २६ जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे. वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा टू झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा ही घोषणाच राहिली.
हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडल्याने ती जबाबदारी आता कोणत्या नेत्यांवर देणार याची चर्चा सुरू आहे. मंत्री असूनही दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी नाही, त्यामुळे या जागेवर दत्ता भरणे यांची वर्णी लागणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.