आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी
वाबळेवाडीचे ग्रामस्थ अशोक पवारांवर संतापले, आंदोलन करून प्रतिमेला जोडे मारण्याचा इशारा
पुणे दि २९(प्रतिनिधी)- शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. पवार यांना त्यांच्याच मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आमदार अशोक पवार यांनी प्रसिद्ध वाबळेवाडीच्या शाळेवर विधानसभेतच गंभीर आरोप केल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विधानसभा अधिवेशनात आमदार अॅड.अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास २५ हजार प्रवेश फी घेवून प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्विकारतात. या शिवाय सीएसआर मार्फत होणा-या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला देत नसल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय वाबळेवाडीची दहा वीस मुले शाळेत असून उर्वरित मुले धनदांडग्यांची आहेत असे ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर वाबळेवाडीचे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार पवार यांना थेट गावबंदीच केली आहे. ही सर्व माहिती राज्याचे दिशाभूल करणारी व शाळेची अब्रु काढणारी विधानसभेत त्यांनी मांडल्याने पालकांनी व ग्रामस्थांनी आज तात्काळ पालकसभा घेवून संतापाच्या भाषेत आमदार पवार यांचा निषेध तर केलाच शिवाय त्यांना गावबंदी करुन त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच या पुढे जर वाबळेवाडीविरोधात बोललात तर आपल्या विरोधात आंदोलन करून प्रतिमेला जोडे मारण्याचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिला आहे. अशोक पवार यांचा निषेध करत वाबळेवाडी ग्रामस्थ चूल बंद ठेवून कडकडीत उपवास करणार आहेत. तसेच ७०० विद्यार्थ्यांना घरी ठेवून या घटनेचा निषेध करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मरगळलेल्या अवस्थेत असताना पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या वाबळेवाडी गावची जिल्हा परिषद शाळा भारतासह जगभरात आदर्श ठरत होती. २०१८ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या शाळेचा शुभारंभ झाला होता. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. आता हा वाद पुढे काय वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.