शिंदे गटातील आमदाराचीच आपल्याच पालकमंत्र्यावर नाराजी
मुख्यमंत्र्याची डोकेदुखी संपेना, आमदारांची समजूत काढताना शिंदेच्या नाकीनऊ
नाशिक दि १३(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचा नाशिकचा बाॅस कोण हेच समजत नसल्याचे सांगत त्यांनी आपली नाराजी उघड केली. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री दादा भुसेंवर टिका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटातील दुफळी समोर आली.
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दादा भुसेंच्या हस्तक्षेपावर उघड नाराजी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड पूर्णपणे चुकीची असल्याची खंत कांदेनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही तयारी केली जात नाही, हे दुर्दैव असल्याचेही सुहास कांदे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नाशिकमध्ये कार्यालय कुठल्या ठिकाणी आहे आणि त्याचे उद्घाटन कधी झाले याची मला कल्पना नाही,असे सांगत त्यांनी शिंदे गटाकडून आपल्याला विश्वासात घेत नसल्याचे सांगत दादा भुसे आपल्याला विश्वासात घेत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. तसेच शिंदे गटामध्ये अनेक जण येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र जिल्ह्यात ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत, त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नसल्याचे सुहास कांदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या मंगळवारी संभाव्य नाशिक दौरा आहे. त्याआधीच शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चांवर कांदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. महत्त्वाच्या बैठकींना बोलावले जात नाही,, स्थानिक बैठकांना मला आमंत्रण देण्यात येत नाही. त्यामुळे मी हजर राहत नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्या स्थानिक बैठकांना मला कधीच आमंत्रण देण्यात आलेली नाही, अशी नाराजी शिंदे गटाचे आमदार सुहास खांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर व्यक्त केली आहे.