‘आमदार साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही लग्नाच बघा’
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे थेट आमदाराला फोन, संभाषण व्हायरल
कन्नड दि १०(प्रतिनिधी)- लग्नासाठी अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडावळ्या बांधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आम्हाला बायको मिळवून द्या’, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी भावी नवरदेवांनी मोर्चा काढला होता. पण आता तर लग्नासाठी आतूर असलेल्या तरूणाने लग्न जमत नसल्यामुळे थेट
आमदारांनाच फोन लावून, ‘तुमच्या मतदारसंघातील मुलगी माझ्यासाठी पाहा’, अशी गळ घातली त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
औरंगाबाद(छत्रपती संभाजी नगर) जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला. तो म्हणाला “घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेती देखील आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नाही.तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना” अशी मागणी थेट आमदारांकडे केली. यावर राजपूत यांनीही तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले. सध्या या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
असा झाला संवाद?
तरूण – हॅलो, साहेब जय महाराष्ट्र
आमदार राजपूत – जय महाराष्ट्र
तरूण – रत्नपूरहून विजय होळकर बोलतोय
आमदार राजपूत – बोला, बोला
तरूण – साहेब, असा विषय होता, ८-९ एकर जमीन आहे. घरी चांगली परिस्थिती आहे. पण इथं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही.
आमदार राजपूत – कुठं?
तरूण – रत्नपूर, खुलताबाद, भद्रा मारूतीजवळ
आमदार राजपूत – तुमचा बायोडाटा पाठवून द्या
तरूण – तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेब
आमदार राजपूत – बरं बरं ठीक आहे, बोलतो
दोघांमध्ये असा मजेशीर संवाद पार पडला आहे आता त्या तरुणाची इच्छा आमदार पूर्ण करणार हे पहावे लागेल.
अलीकडेच लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या नवरदेवांनी मुंडवळ्या बांधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेले मुलं लग्नातील नवरदेवासारखी नटली होती.