मंत्रीपद न मिळाल्यास शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नियोजन बिघडणार? भाजपाही चिंतेत
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, मंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदेंना नाराजी नाट्याला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता काँग्रेसचा एक गट भाजपात येण्याची शक्यता असल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता नको असे म्हणत हिंदुत्व जपण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत असा दावा शिंदे गटाकडून वारंवार केला जातो. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर बाळासाहेब कधीही गेले नसते असे सांगत त्यांच्या सोबत सत्ता नको असेही एक कारण सांगितले गेले. पण आता त्यांचा एक गट भाजपात येणार असेल तर मग काय करायचे याची चिंता शिंदे गटाला आहे. मंत्रीपद न मिळाल्यास आणि शिंदेसोबतचे चार आमदार जरी फुटले तरी, शिंदे गटाला पक्षांतर विरोधी कायद्याचा धोका निर्माण होणार आहे. शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड करून सरकार स्थापन केले.दुसरीकडे, शिंदे जास्तीत जास्त 23 जणांना मंत्री बनवू शकते. मात्र, 31 जणांना मंत्री होण्याची इच्छा आहे. काँग्रेस गट भाजपात आल्यास त्यांना मंत्रिपद द्यायचे झाले तर शिंदे गटाच्या मंत्रीपदाची संख्येला कात्री लागणार आहे. याशिवाय छोट्या पक्षांचे आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा सर्व पेच शिंदे नेमकं कसा हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बंडखोरी करून शिंदेंसोबत आलेल्या अनेक आमदारांना मंत्रीपद हवे आहेत. मात्र, सर्वांनाच मंत्रीपद देणं शक्य नाही. त्यात खरी शिवसेना नेमकी कुणाची या वादावरही अद्यापर्यंत ठोस निर्णय झालेला नसून, हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे जर आगामी मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्यास शिंदेंसोबत आलेले आमदार पुन्हा एकदा शिवसेनेसोबत जाऊ शकतात आणि असे झाल्यास शिंदेंसमोर हा पेच सोडवणं खूप अवघड होऊ शकते.