तीन अपत्य असलेले आमदार, खासदार अपात्र ठरणार?
जगात भारत लोकसंख्येत पहिल्या क्रमांवर, सरकारकडे कायदा करण्याची मागणी
पुणे दि २४(प्रतिनिधी)- जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठी मागणी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, देशात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. पण, तीन अपत्य असूनही काही खासदार आणि आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना केंद्र सरकारने अपात्र ठरवावं,” अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत संतती प्राप्ती ही काही देवाची कृपा नव्हे, तर ही नवरा बायकोची कृपा असते. हे कृपया आपण सर्वांनी आता तरी मान्य करायला हवं.असे परखड मत अजित पवार यांनी मांडले होते, आता तर थेट तीन अपत्य असणाऱ्या आमदार खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अजित पवार यांनी केल्याने चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५ कोटी होती. आता ती तब्बल १४२ कोटींवर पोहोचली आहे. याला आपण सर्वच जबाबदार आहोत.आपला देश, राज्य, जिल्हा आणि प्रदेश यांच्या भल्यासाठी प्रत्येकाने एक किंवा दोन मुले झाल्यावर थांबले पाहिजे असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
लोकसंख्या वाढीमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना रोज सामोरं जावं लगतं. जगातील सर्वात तरुणांची संख्या आसलेला देश आपण आहोत. पण, भविष्याचा विचार केला पाहिजे. पुढच्या पीढीचं नुकसान होणार नाही, याचं चिंतन केलं पाहिजे आणि कठोर निर्णय घेतला पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.