शिंदेसोबत गेलेले ‘हे’ आमदार ठाकरेंकडे परत येणार?
नाराज आमदारांना स्वतः उद्धव ठाकरेंकडून संपर्क, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या पण मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या आमदारांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी परत येण्याची आॅफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय धुमशान रंगले आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेतील ४० आमदार आणि अपक्ष १० असे मिळून ५० आमदारांना घेऊन गेले होते. पण त्यातील दहा आमदारानांच मंत्रीपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर काही आमदारांना आपल्याला निदान महामंडळाची जबाबदारी तरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत गेल्यानंतरही ठाकरेंवर टिका न करणाऱ्या आमदारांना ठाकरेंनी परतीची साद दिली आहे. विशेष म्हणजे या आमदारांची एक यादी बनवली असून त्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि मिळणारी सहानुभूती यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. तर शिंदे गटातील काही आमदारांना आपण पुन्हा निवडून येऊ की नाही याबाबत शांशकता आहे. त्यामुळे काही आमदार पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान आमदार संजय शिरसाट यांच्या अनेकांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळाले नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील कुणीही आमदार ठाकरे गटात परतले तर राज्यात वातावरणनिर्मिती करता येईल असा ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्यानुसार नाराज आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्रातील सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे या चर्चांना जोरदार उधाण आले आहे.