
मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या ते आमच्या सातबाऱ्यावरचं नाव बदलतील. त्यांनी खाडाखोड करून गद्दारांचं नाव टाकलं उद्या आमचा सातबारा खोडला आणि उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार ?तुम्हाला ते नकली म्हणत असतील तर आम्हाला ते नकली शेतकरी म्हणतील अशी भीती लोकांना वाटत आहे अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपावर टीका केली. यावेळी आमचं मत महाविकास आघाडीला आहे असं शेतकरी स्वत:हून सांगत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत ते संवाद साधत होते.
नांदेडमध्ये सभा व्हावी सर्वांची इच्छा होती, पण वेळेची खेचाखेची सुरू आहे. त्यामुळे सभेऐवजी पत्रकार परिषद सुरू आहे. साधारण 2019 साली राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन टोकांचे तीन पक्ष होते, ते एकत्र आले. त्यांचं नेतृत्व माझ्याकडे होतं. सर्वच मित्र पक्षांनी मला उत्तम सहकार्य केलं. मधल्या काळात गद्दारी झाली. ती झाली नसती तर मविआने राज्याला पुढे नेलं असतं. आता पहिल्यांदाच आम्ही तिघे एकत्र निवडणूक लढवत आहोत. आमच्यात चांगला ताळमेळ आहे. सगळीकडे सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. आपल्याच निशाण्या आहेत अशा पद्धतीने काम सुरू आहे. एवढी एकजूट पाहिल्यावर विजय निश्चित असतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात हुकूमशाही विरोधात लाट उसळली आहे. सर्वांच्या मनात भीती संविधान बदलण्याची, घटना बदलण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षातील परिस्थिती तशीच दिसते. या प्रचारावेळी काही शेतकरी भेटले. शेतकरी स्वतहून सांगत आहेत की यावेळी आमचं मत महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्ज मुक्त केलं होतं. असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वात प्रमुख मुद्दा सरकारने सांगितला तो काळजा भिडला. मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या ते आमच्या सातबाऱ्यावरचं नाव बदलतील. त्यांनी खाडाखोड करून गद्दारांचं नाव टाकलं उद्या आमचा सातबारा खोडला आणि उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार. सातबारा बदलण्याची भीती त्यांना वाटत आहे. तुम्हाला ते नकली म्हणत असतील तर आम्हाला ते नकली शेतकरी म्हणतील. आम्ही कुणाकडे दाद मागायची असा सवाल शेतकरी करत होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सुरतमध्ये जादू झाली आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध जिंकला. ही अशी जादू झाली तर सर्वसामान्य काय करणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे. विरोधी पक्षाचे 150 खासदार अधिवेशनात रद्द करून काही कायदे मनमानीपणे मंजूर करून घेतले. हम करे सो कायदा. आम्हाला वाटतं आमचे 48 खासदार निवडून येतील.घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस वाय प्लस सुरक्षा दिली आहे. पण सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे, महिला सुरक्षित नाही. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहे. सुरक्षेचा खर्च कोण करतंय असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला. लोकांकडून कर घेऊन गद्दारांना सुरक्षा दिली जात आहे असा आरोप त्यांनी केला.