
मोदीजी मला खोट्या आरोपात अडकवू नका
दिवंगत माझी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा व्हिडिओ व्हायरल, खळबळजनक दावा म्हणाले हे अनैतिक आहे....
दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे ५ ऑगस्ट रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात प्रदीर्घ आजारानंतर त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात थेट नरेंद्र मोदींचा उल्लेख करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केला होता. पुलवामा दहशतवादी हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीमेवर नेण्यासाठी खरे तर विमानाची व्यवस्था करणे आवश्यक होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा घेऊन जाणे चुकीचेच होते, असे ते म्हणाले होते. तसेच ‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला गप्प बसण्याचे फर्माविले होते’, असेही सत्यपाल मलिक म्हणाले होते. दरम्यान सोशल मिडियावर ९ आॅगस्टपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. या व्हिडीओमध्ये सत्यपाल मलिक म्हणत आहेत की, “मोदीजी मला खोट्या आरोपात अडकवू नका. ज्या प्रकरणात मला अडकवले जात आहे, त्यात मीच तक्रारदार होतो. माझ्याकडे फक्त चार कुर्ते-पायजमे आहेत, ५-६ जोडी कपडे आणि दोन घड्याळे आहेत. हीच काय ती माझी संपत्ती. दिल्लीत एक घर आहे, एवढीच मालमत्ता. मग तरी मला कोणत्या गोष्टीसाठी अडकवले जात आहे. तक्रारदारालाच आरोपी केले जाऊ शकत नाही. हे अनैतिक आहे. त्याचबरोबर रूग्णालयात असताना त्यांनी ट्िट्वरवर देशाला सत्य समजायला हवे असे म्हणत संवाद साधला होता. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे की खोटा याची पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी असताना काही फाईल्सना मंजूरी दिल्याबद्दल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल झाला होता.
उत्तर प्रदेशातील बागपत येथे २४ जुलै १९४६ रोजी मलिक यांचा जन्म झाला. समाजवादी विचारांच्या विद्यार्थी चळवळीतून त्यांनी भारतीय क्रांती दलात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस, जनता दल व अखेरीस भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास होता. त्यांनी जम्मू-काश्मीरसह त्यांनी गोवा, बिहार, मेघालय तसेच ओडिशाचे राज्यपालपदही सांभाळले होते.