मान्सुनची पुन्हा एकदा महाराष्ट्राला हुलकावणी, शेतकरी चिंतेत
हवामान विभागाचा नवीन अंदाज, आता या तारखेला मान्सून बरसणार, पेरणीसाठी मात्र प्रतिक्षा
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे मात्र मान्सून राखडलेलाच दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. पण कोकणात अडकलेला मान्सून अजूनही पुढे सरकण्याचे नाव घेत नाही. आता हवामान विभागाने मान्सुनबाबत नवीन अंदाज जाहीर केला आहे.
यंदा केरळमध्येच उशिरा दाखल झालेला मान्सून अद्यापही राज्यात कोसळलेला नाही. शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या हवामान विभागाकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा अल निनोमुळ पाऊस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण यंदाही हवामान खात्याचे अंदाज चुकलेले आहेत. हवामान विभागाने सुरुवातीला ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. त्यानंतर मान्सून ९ जूनपर्यंत पुणे, मुंबईसह
महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मान्सून तळकोकणात ९ जूनला दाखलही झाला. मात्र मान्सून पुढे सरकलाच नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची १६ जून ही नवी तारीख वर्तवण्यात आली. पण तो अंदाजही चुकला. नंतर मान्सून आगमनाच्या तारखेत पुन्हा बदल करत २३ जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. पण आता त्यात पुन्हा बदल करत २५ जुन ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात २५ तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ जून नंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला जाण्याची शक्यता आहे. सध्या हवामान विभागाकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला आहे.
सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. आणि येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेती कामे करावीत असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आनंदला आहे.