
माझीच मुले अशी का जन्माला आली म्हणत आईचे टोकाचे पाऊल
चिमुकल्यांना घेऊन आईची विहरीत उडी घेत आत्महत्या, दोघांचे मृतदेह सापडले एकाचा शोध सुरु
सोलापूर – आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात ही घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चित्रा बाळासाहेब हाक्के, पृथ्वीराज बाळासाहेब हाक्के, आणि स्वराज बाळासाहेब हाक्के अशी मृतांची नावे आहेत. चित्रा हाके आणि स्वराज हाके यांचा मृतदेह सापडला आहे. मात्र पृथ्वीराज कविराज हाके याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतीमंद होता. त्याच्या उपचारावर मोठा खर्च येत होता. दुसरा मुलगा स्वराज यास ऐकू कमी येत होते. त्याच्यावरही उपचार सुरू होते. यामुळे चित्रा या मानसिक तणावात होत्या. चित्रा हाके यांनी शेतातील ५० ते ६० फूट विहिरीत उडी घेऊन दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे.
त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर दीड वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद सुरू झाली आहे. दरम्यान पृथ्वीराजच्या उपचारासाठी पाच ते सहा लाखांखा खर्च झाला होता. त्यानंतर स्वराजही तसाच जन्मल्याने चित्रा यांनी टोकाचे पाऊल उचचले, अशी चर्चा गावात होत आहे.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे पथक बोलावण्यात आले. या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी सहाच्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. तत्पूर्वी, चिमुकल्या स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. मात्र, पृथ्वीराज उशिरापर्यंत शोध सुरू होता.