खासदार सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?
अजित पवारांचा पत्ता कट, अध्यक्षपदासाठी अगोरदच हालचाली, सुप्रिया सुळेच का?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या सुप्रिया सुळे आणि प्रुफल्ल पटेल ही नावे आघाडीवर आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात देशपातळीवर सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात अडचण नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची तयारी १५ दिवसांपासूनच सुरु झाली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकते फार फार तर उद्या याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव, देशातील सर्व मंत्री आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांशी त्यांचा सलोखा, आणि वागण्या बोलण्यात आदरपूर्वक नम्रपणा ही सुप्रिया सुळे यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत. एकंदरीत अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे याच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गठीत करावी अशी विनंती केली होती. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करेल, संभाव्य समितीत प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.