
शरद पवारांनंतर महाराष्ट्र भाजपानेही भाकरी फिरवली
प्रदेश भाजपमध्ये धक्कादायक बदल, नव्या कार्यकारिणीची घोषणा, बड्या नेत्यांना डच्चू
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कारण लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. त्यासाठी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या टिमसह भाजपा आगामी निवडणूकीला सामोरे जाणार आहे.
भाजपाची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज दुपारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माधव भंडारी यांच्यासह १७ उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे सहा तर विदर्भ आणि मराठवाडाच्या वाट्याला प्रत्येकी तीन उपाध्यक्षपद आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास १२०० जणांची ही जम्बो कार्यकारिणी असणार आहे. याचबरोबर २८८ विधानसभा समन्वयक, नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा अमृतकुंभ अभियान राबवणार आहे. यावेळी बावनकुळेंनी राज्यातील ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा निर्धार असल्याचे सांगितले.
नवीन प्रदेश उपाध्यक्ष
महादेव भंडारी (कोकण), चैनसुख संचेती (पश्चिम विदर्भ), सुरेश हळवणकर (पश्चिम महाराष्ट्र), संजय भेगडे (पश्चिम महाराष्ट्र), अमर साबळे (पश्चिम महाराष्ट्र), स्मिता वाघ (उत्तर महाराष्ट्र), जयप्रकाश ठाकूर (मुंबई), संजय भेंडे (पूर्व विदर्भ), गजानन घुगे (मराठवाडा), राजेश पांडे (पश्चिम महाराष्ट्र), विक्रम बावस्कर (पश्चिम महाराष्ट्र), अतुल काळसेकर (कोकण) अजित गोपछडे (मराठवाडा), एजाज देशमुख (मराठवाडा), धर्मपाल मेश्राम (पूर्व विदर्भ) राजेंद्र गावित (उत्तर महाराष्ट्र) अशी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.