शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे
एकनाथ शिंदे यांच्या नकारात्मक प्रतिमेची खासदारांना धास्ती?,शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस वाढली?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पुढील वर्ष महाराष्ट्रासाठी खुपच महत्वाचे आहे. कारण आगामी वर्षात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाबाबत मोठं विधान केलं आहे.त्यामुळे शिंदे गटाचा मुळ मुद्दाच अडचणीत आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,”एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले खासदार शिंदेंच्या तिकीटावर उभे राहण्यास इच्छूक नाहीत. बऱ्याच लोकांना भाजपाच्या तिकीटावर उभारण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. तसं झालं तर, एकनाथ शिंदेंबरोबर असलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. अर्थात बंडखोरीवेळी शिवसेना पक्षावर दावा करण्यापेक्षा भाजपात विलीन व्हावे असे एका गटाचे मत होते, तर रामदास कदम यांनीही एकनाथ शिंदे यांनी बंड केले नसते तरीही काही आमदारांनी भाजपात जाण्याची तयारी केला होती, असा दावा केला होता. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विधानाने पुन्हा एकदा त्या चर्चांना हवा आली आहे. अर्थात शिंदे गटाकडून या दाव्याचा इन्कार केला असून पाटील यांनी अगोदर आपला पक्ष संभाळावा असा पलटवार केला आहे. तसेच आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या त्या मतदारसंघांमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच महाविकास आघाडीतील तीनही पक्ष व इतर मित्र पक्षांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच एकत्रित बैठक आयोजित केली जाईल. अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
राज्यात २८८ विधानसभा तर ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाने कंबर कसली आहे. शिंदे गट व भाजपा यांच्यातील जागावाटपावरुन सध्या बोलणी सुरु आहेत. तर मविआत देखील जागावाटपावर चर्चा घडत आहेत. पण अंतिम चित्र स्पष्ट होण्यास बराच कालावधी जाणार आहे.