
‘ती माझी नाही झाली तर कुणाचीच होणार नाही’ म्हणत खून
एकतर्फी प्रेमातून मित्राने केला मैत्रिणीचा निर्घृण खून, तब्बल दोन महिन्यानंतर हत्येचा उलगडा, यामुळे दिक्षाच्या मारेकरी सापडला
कुडाळ – कुडाळ मधून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. कुडाळच्या घावनळेमध्ये एका तरुण मुलीची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) मधून दीक्षा तिमाजी बागवे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दोन ऑगस्टला दीक्षा काॅलेजला जायला निघाली, मात्र ती घरी परतलीच नाही. दीक्षा घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. शोधाशोध करूनही दीक्षा न सापडल्याने बागवे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दीक्षा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दिक्षाच्या कॉल रेकॉर्डनुसार तिला शेवटचा कॉल कुणाल कुंभार याचा आला होता. त्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. कुणाल कुंभार हा सावंतवाडीत आयटीआयमध्ये शिकत होता. तर दीक्षा कॉलेजमध्ये होती. दोघांची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीतून घट्ट मैत्रीही झाली. कुणालने तिला प्रेमसंबंधासाठी विचारणा केली. पण ती प्रतिसाद देत नव्हती. यामुळे संतापलेल्या कुणालनं ती माझी नाही तर कुणाचीच नाही म्हणत तिला संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी कुणाल कुंभारनं दीक्षाला दुचाकीवरून आंबेरी-शिवापूर मार्गे बाडोस परिसरात नेलं. मुख्य रस्त्यापासून १०० मीटर आत कच्च्या रस्त्यावर त्यानं दीक्षाची गळा आवळून हत्या केली. तिथं जवळच मृतदेह लपवून ठेवला. कुणाल हा त्याच परिसरातील डॉक्टर शरद पाटील यांच्याकडे काही काळ कामाला होता. त्यामुळे इथल्या परिसराची त्याला चांगली माहिती होती. सुरुवातीला कुणालने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच सत्य सांगितले. आणि तब्बल दोन महिन्यानंतर दिक्षाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी कुणालला अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी कुणाल कुंभारकडून अजून काय काय माहिती येते यावर या हत्येची व्याप्ती अवलंबून असणार आहे. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने शवविच्छेदनासाठी तो कोल्हापूर ‘सीपीआर’ रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.