विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 12 जुलै) विधानसभेत अनेक सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना खडेबोल सुनावले. ज्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले आणि आमदार कदम यांच्यामध्ये तू-तू… मैं-मैं… झालेली यला मिळाली. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित करत म्हटले की, लाडकी बहिण योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक कामे थांबली जात आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाइनच्या माध्यमातून ज्या प्रमाणे नोंदणी करत आहेत, त्याचप्रमाणे आता मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही याबाबतची नोंदणी करावी, अशी मागणी पटोले यांच्याकडून करण्यात आली. त्यांच्या या मागणीला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली.
आमदार नाना पटोले यांच्यानंतर आमदार राम कदम यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काही विषय सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानाला उत्तर देत म्हटले की, नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. मात्र, नाना पटोले यांना वस्तूस्थिती माहिती नाही. माझ्या घाटकोपर मतदारसंघात एका घरात तीन बहिणी आहेत. त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा चुकीचा अर्ज भरत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टला आमच्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जाऊ नये, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, असा थेट आरोपच राम कदम यांच्याकडून करण्यात आला.आमदार राम कदम हे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आक्रमक होत म्हटले की, आज अनेक गोरगरीब महिला लोकांच्या घरी जाऊन भांडी घासतात, त्यांना या योजनेतून दोन पैसे मिळालेले तुम्हाला बघवत नाही. महाविकास आघाडीला केवळ चांगल्या योजनांचे राजकारण करायचे आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना गरीब महिलांना पैसे मिळत असतील तर तुमच्या पोटात काय दुखते? नाना पटोले यांना या योजनेची माहिती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना फसली पाहिजे, असा विरोधकांचा प्रयत्न आहे, असेही यावेळी आमदार कदम यांनी सांगितले.
आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीवर आरोप करताच यावर मविआच्या आमदारांनी संताप व्यक्त केला. तर आमदार नाना पटोले यांनीही राम कदम यांना सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले की, लाडकी बहीण योजनेला आमचा कोणताही विरोध नाही. सरकारने काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या योजनेचा अर्ज करण्यासाठी जे अॅप आणि वेबसाईट आहे. त्यांचा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे तहसीलमध्ये रांगा लागल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होतो आहे. त्यांना जातप्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे मिळत नाही. म्हणून मी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी वर प्रश्न उपस्थित केला, मात्र, सत्ताधाऱ्यांना याचे केवळ राजकारण करायचे आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांच्याकडून देण्यात आले. त्यामुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार नाना पटोले आणि आमदार राम कदम यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी यला मिळाली.