Latest Marathi News
Ganesh J GIF

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.

शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे स्वॅट आणि एनएसजी कमांडो तैनात असतील. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, या समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा योजना तयार करण्यासाठी पोलीस मुख्यालय आणि नवी दिल्ली जिल्ह्यात अनेक बैठका घेतल्या. शपथ विधी समारंभ राष्ट्रपती भवनात होणार असल्याने या परिसरात आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल. बाहेरील घेऱ्यात दिल्ली पोलिसांतील जवान तैनात असतील. यानंतर निमलष्करी दल तैनात असेल आणि आतील घेऱ्यात राष्ट्रपती भवनाच्या अंतर्गत सुरक्षेतील जवान तैनात असतील.संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या आणि दिल्ली सशस्त्र पोलीस (डीएपी) दलासह सुमारे 2,500 पोलीस कर्मचारी घटनास्थळाभोवती तैनात करण्याची योजना आहे. आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्यवर ज्या मार्गांचा वापर करतील त्या मार्गावर ‘स्नायपर’ आणि सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी तैनात असतील. तसेच नवी दिल्ली जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोनही तैनात करण्यात येणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!