पुणे जिल्हातील बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
जिल्ह्यातील बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता, वाचा सर्व निकाल सविस्तर
पुणे दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले असून, राज्यभरात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत पण पुणे जिल्ह्यात झटका बसला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या मदतीने भाजपाने प्रवेश केला आहे.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीतील बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला १८ पैकी १३ जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. पण जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले आहे. मावळमध्ये महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मविआचे १७ तर भाजप-शिंदे गटाच्या एका सदस्याची वर्णी लागली आहे. मविआच्या १७ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ तर काँग्रेसा २ जागांवर विजय झाला आहे. भोरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आमदार थोपटेंनी आपला गड राखताना १८ पैकी १८ जागांवर विजयी मिळवला आहे. खेडमध्येही राष्ट्रवादीने निसटते बहुमत मिळवले आहे.एकूण १८ जागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला १०, सर्वपक्षीयांना ६, त्यात उद्धव ठाकरे शिवसेना ३, भाजप २ आणि काँग्रेस १ आणि अपक्ष २ असा निकाल लागला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम हेही निवडून आले आहेत. बारामती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला. निरा बाजार समितीतही महायुतीने १९- ९ अशा फरकाने भाजप शिवसेनेचा पराभव केला आहे.
दरम्यान तब्बल २० वर्षांनी पुणे बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यामुळे या बाजार समितीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात आता बंडखोरांनी भाजपच्या मदतीने बाजार समिती निवडणुकीत सत्ता काबीज केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.