
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू
माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा, अजून किती दिवस राष्ट्रवादी सोबत राहणार यावरही शंका?
बेळगाव दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक निवडणूकीतील प्रचार सभेत चव्हाण यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असतो तो रद्द झाला आहे. त्यांना इतर राज्यांमध्ये मतं मिळाली नाहीत, म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचा दर्जा काढून टाकला आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल म्हणून टक्केवारीसाठी निवडणूक आहे. भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी आहे.” असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. पण पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलिकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबद्दल वेगवेगळे दावे केले जात होते. पण आता राष्ट्रवादीच्या आघाडीतला सहकारी असलेल्या काँग्रेसनेच राष्ट्रवादीबाबत खळबळजनक दावा केला आहे.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी चव्हाण म्हणाले की, शरद वार यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरही त्यांच पक्षातील स्थान महत्वाचं राहणार आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधीचा दाखला दिला आहे.