
फक्त एक लाख रुपयासाठी नव विवाहितेला विष पाजून मारले
लग्नाच्या अवघ्या बारा दिवसानंतर तरूणीचा अंत, हुंड्यासाठी घेतला जीव, तपासात धक्कादायक खुलासा
नांदेड – पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडा प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. पण तरीही राज्यातील हुंडाबळी थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथे एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ताऊबाई चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ताऊबाईचा विवाह राठोडवाडी (अखरगा) येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. लग्नावेळी ताऊबाईच्या कुटुंबीयांनी ६ लाख रुपये रोख आणि ३ तोळे सोने हुंडा म्हणून देण्याचे ठरवले होते. यापैकी ५ लाख रुपये रोख, एक तोळ्याची अंगठी आणि दोन तोळ्यांचे लॉकेट लग्नात देण्यात आले. तर उरलेले १ लाख रूपये नंतर देण्याचे ठरले. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवसापासूनच ताऊबाईचा छळ सुरू झाला होता. सासरच्या मंडळींनी तिला माहेरहून उर्वरित १ लाख रुपये आणण्याची मागणी केली. “तू १ लाख रुपये घेऊन ये, मला दूध डेअरी टाकायची आहे’, अशी धमकी सुधाकरने ताऊबाईला दिली. यामुळे ताऊबाई माहेरलाही जाऊन आली. तिचे वडिल वामन चव्हाण यांनी तिला समजावले. पण ९ जुलै रोजी सकाळी ताऊबाईच्या माहेरच्यांना फोन आला. ताऊबाईला उलट्या होत आहेत आणि तिची प्रकृती गंभीर असल्याचे सासरच्यांनी सांगितले. यानंतर तातडीने ताऊबाईवर मुखेड येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान १३ जुलैला ताऊबाईचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे. १ लाख रुपयांसाठी ताऊबाईचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. अखेर तिला विष देऊन तिचा खून करण्यात आला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ताऊबाईच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी ताऊबाईचा खून केला. लग्नाच्या अवघ्या बारा दिवसातच ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खून आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीसह सासू, सासरे यांना अटक करण्यात आली आहे. विवाहितेला विष देण्यात आले का? की तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली आहे.