खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या
पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावाचे प्रयत्न, पर्यटकाकडून नियमांना हरताळ
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे शहराजवळील खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ काही मुली आल्या होत्या. आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. पण त्याच ठिकाणी काही स्थानिकही तिथे होते. मुलींची मदतचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले, पण दोन मुली त्यांना न सापडल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. खडकवासला धरणाची चाैपाटी बंद करण्यात आली असून पाण्यात उतरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे काही पर्यटक इतर ठिकाणावरुन पाण्यात उतरत आहेत.
खडकवासला धरणात कालही एक तरुण बुडाल्याची घटना घडली होती. जुबेर इस्माईल शेख हा तरुण पोहण्यासाठी आला होता. पण कालव्यात पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे तो अचानक दिसेनासा झाला होता. त्याचाही शोध घेतला जात आहे.